
पडघा: भिवंडी तालुक्यातील पडघे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक पाणी सत्याग्रहाची साक्ष देणारी १०० वर्षे जुनी सर्वे नं. ७९/१० मधील सतीची विहीर बुजवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या घटनेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात पत्रकार मिलिंद जाधव यांनी मुंबई, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय, ठाणे जिल्हाधिकारी, भिवंडी प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
पडघा ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नं. ७९/१० मधील सतीची विहीर जवळपास १०० वर्ष जुनी असून त्याच सतीच्या विहिरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी सत्याग्रह केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडघे, समतानगर येथे काशिनाथ हाशाबा दोंदे यांच्या घरी उतरले होते. याच काळात सतीची विहीर निवडून येथे सत्याग्रहींसह पाणी काढण्यात आले होते. या घटनेचा उल्लेख ‘ठाणे संघसरिता’ या पुस्तकात स्पष्टपणे करण्यात आला आहे.
आम्ही लहान होतो, तेव्हा डॉ.बाबासाहेब पडघ्यात आले होते. सतीच्या विहिरीवर त्यांनी पाणी सत्याग्रह केला. एका शिसवीच्या झाडाखाली त्यांची मोठी सभा झाली होती. ‘मुलांना शिक्षण द्या’ असा संदेश त्यांनी आम्हाला दिला होता. समतानगर मधील काशिनाथ दोंदे यांच्या घरी उतरले होते. तर चहा पाणी घेतला होता. अशी आठवण समतानगर येथील हिराबाई सोनावणे (९५) यांनी सांगितली.